पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे. या योजनेत सरकार शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यावर पैसे पाठवते. एकूण 6000 रुपये वर्षाला दिले जातात आणि हे पैसे तीन वेळा, म्हणजे 2000-2000 रुपये करून मिळतात.
सध्या सगळ्या शेतकरी भावंडांना 20व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. ही रक्कम जुलै महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात त्यांच्या खात्यावर जमा होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यापूर्वीचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी मिळाला होता. त्यामुळे 20वा हप्ता जूनच्या शेवटी किंवा जुलैच्या सुरुवातीला मिळण्याची शक्यता होती.
पण हे पैसे मिळावेत, यासाठी काही गोष्टी नीट तपासणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आधार नंबर, बँक खात्याची माहिती किंवा इतर तपशील चुकीचे दिले गेले असतील, तर पैसे अडकू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी खात्री करून घ्यायला हवी की त्यांचं नाव लाभार्थी यादीत आहे का.
तुमचं नाव यादीत आहे का हे कसं पाहायचं?
- सर्वप्रथम pmkisan.gov.in या वेबसाइटला जा.
- “Farmer Corner” नावाच्या भागात “Beneficiary List” या पर्यायावर क्लिक करा.
- नंतर आपलं राज्य, जिल्हा, तालुका आणि गावाचं नाव भरावं.
- त्यानंतर “Submit” बटन दाबा आणि यादीत तुमचं नाव पाहा.
तुमच्या खात्यावर पैसे आले का हे बघायचंय का?
- “Farmer Corner” मध्ये “Beneficiary Status” या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमचा आधार क्रमांक, मोबाईल नंबर किंवा बँक खाते नंबर टाका.
- “Submit” केल्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यावर पैसे आले की नाही हे कळेल.
ही योजना 2019 साली सुरू झाली होती. पहिल्यांदा बिहारमधील भागलपूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा लाभ देण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाच वेळी 9.08 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 22 हजार कोटी रुपये जमा करून दिले होते.
शेतकऱ्यांना हा लाभ वेळेवर मिळावा यासाठी योग्य कागदपत्रं, बँक तपशील आणि आधार कार्ड यांची माहिती योग्य असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे जर हे सर्व नीट असेल, तर तुमचंही नाव यादीत असेल आणि लवकरच 2000 रुपये तुमच्या खात्यावर जमा होतील.